पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पेण येथील महिलांनी अहिल्याबाईंच्या २००व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून १८ ऑक्टोबर १९९६ रोजी “अहिल्या महिला मंडळ स्थापन केले. प्रगत मानवी जीवनाला संस्काराची आवश्यकता कोणीच नाकारत नाही. म्हणूनच संस्कार केंद्र. शिशुवर्ग ते इ. ४ थी पर्यंत पेण जवळील ग्रामीण आणि आदिवासी मुलांना शहराशी जोडण्यासाठी “मुक्ताई विद्यामंदिराची" स्थापना केली. देववाणी संस्कृत, ज्ञान, विज्ञान, धर्म नीति वैद्यक यांचा अमृततुल्य साठा असलेली भाषा आहे. तिचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने संस्कृत पाठशाळेची स्थापना केली. ती “इंदिरा संस्कृत पाठशाळा" होय. जनजाती जीवन आजही असावे तेवढे प्रगतीशील नाही. आदिवासी मुलींना शिक्षण मिळून मुख्य शहरी जीवन प्रवाहाशीत्यांना मिसळता यावे म्हणून “आनंदी वसतीगृह” सुरु केले. "विष्णूपंत भागवत" वाचनालय मंडळाच्या इमारतीत सुरु झाले. सामाजिक आरोग्य हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून "डॉ. घाटे आरोग्य केंद्र" स्थापन केले. इथे रक्त, लघवी, थुंकी इ. ची तपासणी अल्पदरात केली जाते. सर्वसामान्य स्त्रिया स्वावलंबी होण्यासाठी स्वादभारती, स्वयंसिध्दा, माहेर या आयामाद्वारे कार्य केले जाते. त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. गतीमान जीवनामुळे मुलांना आईवडीलांना सांभाळणे कठीण जाते. अशा परिस्थितीत वृध्दांचे एकाकीपण टाळण्यासाठी तसेच त्याचे उर्वरीत आयुष्य आरोग्यपूर्ण, शांततेने, समाधानाने जावे म्हणून "संजीवन आश्रम" मंडळाने सुरु केला आहे.